लोहगावातून कोण मारणार बाजी?
भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरळ लढत
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
सध्या सुरु असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये लोहगाव हे प्रभाग क्रमांक एक आणि तीन मध्ये विभागले आहे. या दोन्ही प्रभागात वेगवेगळे पक्ष आणि अपक्षांच्या माध्यमातून लोहगावचे तब्बल नऊ उमेदवार रिंगणात आहेत. यातील दोन जागांचा अपवाद वगळता सर्वच लढती या लोहगावकर विरुद्ध इतर अशाच आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये काही ठिकाणी तिरंगी लढत होत असली, तरी प्रमुख लढत ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याच मध्ये होणार आहे.
या चारही जागांचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देतांना भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन उमेदवारांची निवड केलेली दिसत आहे. ज्यात वाघोलीत दोन, नगर रस्ता भागात एक, तर लोहगावातील एका उमेदवाराला संधी देऊन भौगोलिक समतोल साधला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला हा समतोल साधता आलेला दिसत नसून वाघोलीत एकही उमेदवार न दिल्याने तिथे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तुलनेने लोहगावातील मतदान जास्त असले तरीही लोहगावात भारतीय जनता पक्षाची ताकद राष्ट्रवादी इतकीचं आहे. अशातचं दोन जागांसाठी गावातील इतर पक्षातील स्थानिक उमेदवार असल्याने त्याचा थेट फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसणार आहे. राष्ट्रवादीने सध्या, “आमची माती आमची माणसं.” म्हणत, ‘स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या.’ असा प्रचार सुरु केला आहे. मात्र तो मतदारांपर्यंत तितक्या ताकदीने पोहचलेला दिसत नाही. जरी पोहचला तरी अद्याप मतदारांच्या पचनी पडल्याचे सध्या तरी वाटत नाही.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विमाननगर भागातील मोठमोठ्या सोसायट्या आणि उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करुन घेतले आहे. चार पैकी तीन उमेदवार उच्चशिक्षित आणि तरुण, तर चौथा उमेदवार मेन्टॉर (मार्गदर्शक) असल्याचे त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केले असून त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये बिंबवण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसत आहेत. त्यापटीत राष्ट्रवादीचे उमेदवार गावगाड्यातच अडकल्याचे चित्र आहे. निवडणूकीत दोन्ही बाजूंनी विकासाचे मुद्दे पुढे केले जात असले, तरी विकास कसा करणार? त्याचे व्हिजन काय असेल? याबाबत उमेदवारही संभ्रमात आहेत.
आपण थोडक्यात पाहूयात प्रमुख पक्षांतील थेट लढतीमध्ये कोणाचे पारडे जड असेल? आणि कोणाचे हलके?


प्रभाग ३ (अ) :-
- भाजपच्या उमेदवार डॉ. श्रेयस खांदवे यांना कौटुंबिक वारसा आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. तर राष्ट्रवादीच्या उषा कळमकर यांच्याकडे दीर्घ अनुभव आहे. मात्र लोहगावचा विचार केल्यास खांदवे यांच्या पाठीमागे लोहगावातील एक मोठा गट ठामपणे उभा आहे. तर स्थानिक उमेदवार असल्याने दुसऱ्या गटातील काही मतदार खांदवे यांच्या एका जागेसाठी मतदान करण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी क्रॉस वोटिंगची शक्यता आहे. तर वाघोली आणि इतर भागात नात्यागोत्यांचे समीकरण खांदवे यांच्या पथ्यात पडेल अशी शक्यता आहे. याच बरोबर विमाननगर परिसरातील पारंपरिक भाजपचा मतदार असल्याने कळमकर ताईंच्या विरोधात खांदवे यांचा विजय सोपा असल्याचे मानले जात आहे.
प्रभाग ३(ब) :-
- या जागेसाठी भाजपकडून अनिल सातव विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील खांदवे यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून सागर खांदवे यांनी उडी घेतल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. कॉंग्रेस पक्षाची ताकद पाहता लढत तिरंगी जरी नसली, तरी राष्ट्रवादीच्या खांदवेंसाठी मारक नक्कीच आहे. कारण यापूर्वी विधानसभेला दोन्हीही खांदवे बंधूंनी एकत्रित एकाच पक्षाचे काम केले होते. सुनील खांदवे यांना मानणारा मोठा वर्ग लोहगावात आहे. मात्र या ठिकाणी होणारा मतविभाजनाचा फायदा हा थेट प्रतिस्पर्धी उमेदवार सातव यांना होणार आहे. अनिल सातव यांनीही नात्यागोत्यांच्या जोरावर वाघोली पाठोपाठ लोहगावातही आपला निर्णायक जनाधार तयार केला आहे. त्यामुळे सुनील खांदवे, सातवांना लोहगावात कितपत रोखू शकतात? आणि वाघोली- विमाननगरमधून किती मते मिळवतात? यावर विजयाची समीकरणे ठरणार आहेत.
प्रभाग ३(क)
- या जागेकरिता भाजपकडून ऐश्वर्या पठारे विरुद्ध राष्ट्रवादीकडून उज्वला खांदवे यांच्यात थेट लढत होत आहे. या दोन्हीही उमेदवारांना शिंदेंच्या सेनेकडून गायत्री पवार यांनी आव्हान दिले आहे. पती हर्षवर्धन पवार यांची सेनेप्रती असलेली निष्ठा आणि आई शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंदाकिनी खुळे यांनी यापूर्वी केलेल्या कामांच्या जोरावर त्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. या लढतीत पवार यांचे लोहगाव-वाघोली-विमाननगर परिसरात असलेले नातेसंबंध आणि मित्रपरिवाराच्या जोरावर त्या निर्णायक मते घेण्याची शक्यता आहे. त्याचे थेट परिणाम उज्वला खांदवे यांच्या मतांवर पडणार असून, या गोष्टी पठारे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. शिवाय स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील उमेदवार असल्याने पठारेंची संपुर्ण टीम मैदानात उतरलेली आहे. एक वर्षांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पठारे यांनी लोहगाव-विमाननगर हा परिसर पिंजून काढला होता. या भागावर मजबूत पकड असल्याने पठारे येथून मताधिक्य मिळवतील. असा राजकीय अंदाज आहे. त्यामुळे उज्वला खांदवेंसाठी ही लढत अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे.
प्रभाग ३ (ड)
- प्रभागातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जात असून दोन्हीही बाजूने मातब्बर उमेदवार असल्याने या लढतीकडे सर्वांचेच लक्ष आहे. राष्ट्रवादीच्या बंडु खांदवे विरुद्ध भाजपचे रामदास दाभाडे अशी ही लढत होत आहे. खांदवे यांनी यापुर्वी पंचायत समितीचे उपसभापती पद भूषवले असून, मागील एकोणवीस वर्षांपासून ते सक्रीय राजकारणात आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवार दाभाडे यांच्याकडे स्थानिक राजकारणाचा दीर्घ अनुभव असून ते वाघोलीचे सरपंच, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. वाघोलीतील मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी असून ते वाघोलीतून किती आघाडी मिळवतात? यावर बरीच समीकरणे ठरणार आहेत. तर खांदवे यांच्यासाठी लोहगावातील तरुण मैदानात उतरले असून त्यांच्या विजयाचे आडाखे बांधत आहे. नुकतेच राष्ट्रवादीतील दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने बंडू खांदवेंसाठी ही लढत अडचणीची बनली आहे. तर दुसरीकडे दाभाडे यांनी लोहगावात शिरकाव करीत आपले समर्थक आणि नातेवाईकांना जोमाने कामाला लावल्याने दाभाडेंचे वर्चस्वही वाढत आहे. त्यामुळे खांदवे यांच्यासाठी ही लढत अटीतटीची बनली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले ते लोहगावातील पहिले उमेदवार आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्यासाठी घड्याळाचा गजर वाजणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.
फोटो: १) प्रभाग क्रमांक ३ भारतीय जनता पार्टी
२) प्रभाग क्रमांक ३ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.















