लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. आता सुरेंद्र पठारे यांच्यासोबत पुतण्या माजी नगरसेवक महेंद्र पंढरीनाथ पठारे, भाचा माजी सरपंच संतोष भरणे हे देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यांच्या प्रवेशाचा विजया दशमी दसरा हा शुभ मुहूर्त चर्चित होता. मात्र तो टळला आहे. आता नव्याने प्रवेशाचा मुहूर्त नागरिकांमधून ऐकायला मिळेल.कोण कोण प्रवेश करणार याचीच यादीच सोशल मीडियावर फिरत आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. केवळ तांत्रिक दृष्ट्या आमदार पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात राहतील. मात्र या केवळ चर्चा आहेत की खरोखर पठारे कुटुंबीय भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार याचे स्पष्टीकरण तरी पठारे कुटुंबियांनी माध्यमांसमोर येऊन अद्याप दिलेले नाही.
दरम्यान पठारे कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टी मधील काही नेते, स्थानिक कार्यकर्ते यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा विरोध कितपत टिकणार की वरिष्ठ पातळीवरून सर्व हालचाली होणार असा देखील एक सूर आहे. पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.















