सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत नसल्याने पक्षीय चिन्हांपेक्षा राष्ट्रध्वजाला प्राधान्य
तिरंगा रॅलीतून दिला संदेशात
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकहित, पारदर्शकता आणि प्रामाणिक सार्वजनिक जीवन या मूल्यांवर आधारित राजकीय कामाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राष्ट्र प्रेमासोबतच लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
विमान नगर मधील गणपती चौक येथून सुरू झालेली ही रॅली यमुनानगर–विमाननगर परिसरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅलीदरम्यान कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा अथवा चिन्ह न वापरता सर्व सहभागींच्या हातात केवळ देशाचा तिरंगा देण्यात आला होता. यामुळे ही रॅली कोणत्याही पक्षीय प्रचाराशी संबंधित नसून राष्ट्रप्रेम आणि लोकहिताचा विचार मांडणारी असल्याचा ठळक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
रॅलीदरम्यान आयोजक चंद्रकांत जगधने यांनी आपले मत मांडताना सांगितले,
“राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा संघर्ष नसून ते समाजासाठी जबाबदारीने काम करण्याचे माध्यम आहे. पक्षाचा झेंडा हातात घेण्यापेक्षा देशाचा झेंडा हातात घेऊन काम केल्यास लोकांचा विश्वास अधिक मजबूत होतो.”
ते पुढे म्हणाले “निवडणुकांमध्ये अनेक वेळा प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आर्थिक ताकद असलेल्यांनाच पुढे केले जाते, ही लोकशाहीसाठी योग्य बाब नाही. समाजाशी थेट जोडलेले, जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत.”















