विजयाची मुहूर्तमेढ प्रभाग १ मधून करूयात : मुरलीधर मोहोळ
मेट्रो आळंदी पर्यंत धावणार; कळस मध्ये पदयात्रा काढत नागरिकांशी साधला संवाद
विश्रांतवाडी : प्रतिनिधी
पुण्याचा विकास आम्ही करू असे काही जण म्हणतात. मात्र देशात आणि राज्यात आमची सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेतही सत्ता येणार असल्याने विजयाची मुहूर्तमेढ चारही नगरसेवक निवडून प्रभाग १ मधून करूयात. पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनवू असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १ मधील भाजप व आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार अश्विनी राहुल भंडारे(अ गट), संगीता संदीप दांगट (ब गट), वंदना संतोष खांदवे (क गट) व अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे (ड गट) यांच्या प्रचारार्थ कळस येथे पदयात्रा काढण्यात आली. स्वतः मुरलीधर मोहोळ पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यासह भाजपच्या उमेदवारांचे स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. जागोजागी औक्षण करत पुष्पवृष्टी केली.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती. त्यांच्या काळात शहराचे वाटोळे केले. आता परत कारभार आमच्या हातात द्या, असे अजित पवार म्हणतात. मात्र पुढचे २५ ते ३० वर्ष पालिकेत भाजपाचीच सत्ता असणार आहे. पुणेकर नेहमी सर्वांगीण विकासाला, विचाराला व उज्ज्वल भविष्याला मत देतात. त्यामुळे भाजपाचे १२५ नगरसेवक निवडून येणार असल्याने महापौर भाजपाचा होईल असा विश्वास देखील मोहोळ यांनी व्यक्त केला. माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले, आजची पदयात्रेतील गर्दी पहाता ही विजयाची जाहीर सभा असल्याचे ते म्हणाले. अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली चारही नगरसेवक निवडून येतील यामध्ये काही शंका नाही. यावेळी बोलताना उमेदवार अनिल उर्फ बॉबी टिंगरे म्हणाले, प्रभाग खूप मोठा आहे आणि वेळ कमी आहे. त्यामुळे सर्व मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नाही. तरीही आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचत आहोत. मागील काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजपच्या चारही उमेदवारासह यावेळी मी विजयाची हॅट्रिक करणार आहे,असे अनिल(बॉबी) टिंगरे म्हणाले. कळस येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चौकातून पदयात्रेला सुरवात झाली. संपूर्ण कळस गावात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप-आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कळसमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेट्रो आळंदी पर्यंत धावणार
मेट्रोचे जाळं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात १२० किलोमीटर पर्यंत करण्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. आळंदीपर्यंत मेट्रो धावणार असल्याने त्याचा फायदा कळस, विश्रांतवाडी, धानोरी परिसरातील नागरिकांनाही होणार आहे. त्यामुळे काम करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच विकासाला मत द्या ,असे आवाहन मंत्री मोहोळ यांनी केले.















