लोहगावातील मंदिरांत घुमू लागले काकडआरतीचे स्वर भल्या पहाटे भूपाळी, महाआरती, पसायदान
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
‘उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला,’ ‘वाळवंटापासुनी महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडूनी हात…’ आदी अभंग, चरण, भूपाळी, भजन, वासुदेव, जोगी, आंधळेपांगुळे, मुका-बहिरा, गवळण, महाआरती, पसायदानाने गावोगावी काकडआरतीचा गजर सुरू झाला आहे. संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेल्या लोहगाव मधील तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिर, दत्त मंदिर यासह गावातील सर्व मंदिरात पहाटेच्या वेळी काकड आरतीचे स्वर कानावर पडत आहेत. आश्विन कृष्ण प्रतिपदा ते कार्तिक कृष्ण प्रतिपदेपर्यंत संपूर्ण महिनाभर काकड आरती होत असते. पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीला अभिषेक करून पूजा केली जाते. आरती करून पसायदानाने रोज काकडआरतीची सांगता होते. गावातील भाविक-भक्त, आबालवृद्ध, महिला मोठ्या आनंदाने या कार्यक्रमाला उपस्थित रहात आहेत.


















