राष्ट्रवादीचे आमदार पठारे यांचा मुलगा व सून भाजपतर्फे रिंगणात; त्यांच्या घरातील तीन उमेदवार रिंगणात
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांच्या घरातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधून पठारे यांच्या सुनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे या रिंगणात आहेत. तर प्रभाग चारमधून पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व भाचे संतोष भरणे यांच्या पत्नी तृप्ती भरणे निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत. प्रभाग ३ व ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. तरीसुद्धा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना महाविकास आघाडी, शिवसेना शिंदेगट व इतर पक्षाच्या उमेदवारांसह तगड्या अपक्षांशी देखील टक्कर द्यावी लागणार आहे.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणला. मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांचा भाजपकडे कायम कल राहिला. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर मतदारसंघातील सर्व समीकरणे बदलली असली तरी त्यांच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या होत्या. त्यामध्ये स्वतः सुरेंद्र पठारे ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, तृप्ती संतोष भरणे व पठारे यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगरसेवक ऍड भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश आहे. ऍड जाधव यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपचा एबी फॉर्म जोडला होता. परंतु शेवटच्या क्षणी जाधव यांच्या ऐवजी शैलजीत बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. जाधव यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण आहे. त्यामुळे विद्यमान आमदार असतानाही भाजपने केवळ तीन जागा देऊन पठारे यांची बोळवण केल्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
प्रभाग ३ मधून ऐश्वर्या पठारे यांची लोहगाव मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला मिलिंद खांदवे यांच्याशी सरळ लढत होणार आहे. त्याचबरोबर प्रभाग ४ मधून सुरेंद्र पठारे यांचा वाघोलीतील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भाडळे यांच्याशी सामना होणार आहे. तर संतोष भरणे यांच्या पत्नी तृप्ती भरणे यांची लढत दर्शना स्वप्नील पठारे यांच्याशी सरळ होण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रभागात तगडे उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे आमदार पठारे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार की पुत्र प्रेमासाठी व घरातील उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचा प्रचार करणार ? हे लवकरच समजेल.
प्रभाग क्रमांक ३ – लोहगाव-वाघोली-विमाननगर
भाजपचे अधिकृत उमेदवार
३ अ – नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला – डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे
३ ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – अनिल सातव
३ क – सर्वसाधारण महिला – ऐश्वर्या सुरेंद्र पठारे
३ ड – सर्वसाधारण – रामदास दाभाडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
३ अ – नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला – उषा कळमकर
३ ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – सुनील खांदवे
३ क – सर्वसाधारण महिला – उज्वला मिलिंद खांदवे
३ ड – सर्वसाधारण – बंडू खांदवे
—- ——— ————————– —— ——

प्रभाग क्रमांक ३ राष्ट्रवादीचे उमेदवार
प्रभाग क्रमांक ४ – वाघोली-खराडी
भाजपचे अधिकृत उमेदवार
४ अ – अनुसूचित जाती सर्वसाधारण – शैलजीत बनसोडे
४ ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – रत्नमाला संदीप सातव
४ क – सर्वसाधारण महिला – तृप्ती संतोष भरणे
४ – ड – सर्वसाधारण – सुरेंद्र पठारे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
४ अ – अनुसूचित जाती सर्वसाधारण – नानासाहेब आबनावे
४ ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – वसुंधरा उबाळे
४ क – सर्वसाधारण महिला – दर्शना स्वप्नील पठारे
४ – ड – सर्वसाधारण – समीर भाडळे















