रांगोळ्यांची पायघडी, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भाजपा उमेदवारांचे स्वागत
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
रांगोळ्यांची पायघडी, फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात सर्वच घरासमोर औक्षण केलेले पाहून प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा उमेदवार भारावून गेले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे, डॉ श्रेयस खांदवे, अनिल सातव, रामदास दाभाडे यांनी मंगळवारी (ता. ५) सकाळी व संध्याकाळी वाघोली परिसरातील विविध भागांमध्ये आशीर्वाद यात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या यात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी खांदवे नगर बस स्टॉप येथून आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. रामचंद्र काळे नगर, संताजी नगर, गीताई पार्क, कोलते पार्क, अष्टविनायक सोसायटी परिसरातून ही यात्रा पुढे जात संताजी नगर, कोलते पार्क परिसरात समाप्त झाली. यानंतर संध्याकाळी कावडे वस्ती येथून दुसरी आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. त्रिमूर्ती मंडळ, गणेश पार्क मार्गे साई सत्यम पार्क येथे या यात्रेचा समारोप झाला.
यात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, पथदिव्यांची कमतरता, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा, शिक्षण विषयक प्रश्न तसेच परिसरात उद्यान (गार्डन) विकसित करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी मांडली.
नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत प्रभागाच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध व दीर्घकालीन विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यांवर आधारित संवाद आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत या लढतीला अधिक बळ मिळाल्याचे चित्र या आशीर्वाद यात्रेतून स्पष्ट झाले.
उमेदवार ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, रामभाऊनी वर्षानुवर्ष जपलेली ही माणसे आहेत. साक्षात श्री रामाचे जसे स्वागत केले जाते तसे आम्हा चारही उमेदवारांचे रहिवाशांनी स्वागत केल्याने आम्ही भारावून गेलो.















