मुंजाबा वस्ती मधील गुन्हेगारी मोडीत काढणार- शशीकांत टिंगरे
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ कळस- धानोरी – लोहगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसाधारण गटातील उमेदवार शशिकांत टिंगरे, ओबीसी महिला गटातील रेखा टिंगरे, एसटी गटातील नूतन प्रताप, एससी गटातील आरती चव्हाण यांनी धानोरी मधील मुंजाबा वस्ती परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला. धानोरी मध्ये प्रचाराचा झंजावत दौरा करत मतदारांशी संपर्क केला. मुंजाबा वस्ती मध्ये गुन्हेगारी वाढली असल्याने सर्व सामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. युवा पिढी व्यसनाधीन झाली आहे. आपण निवडून आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत गुन्हेगारीवर वचक ठेवत व्यापारी आणि सर्व सामान्य नागरिकांना भय मुक्त वातावरणात जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शशिकांत टिंगरे यांनी दिले.
शशिकांत टिंगरे म्हणाले, धानोरीतील मुंजाबा वस्ती मधील डिपी रस्त्यात बाधित होणारी घरे वाचवून योग्य तो पर्यायी मार्ग काढणार आहे. वस्ती मध्ये रोज होणारी वाहतूक कोंडी कमी करणार आहे. सर्वांना महापालिके मार्फत चांगल्या सुविधा देणार आहे. नाल्यावरील अतिक्रमणे काढून पूर परिस्थिती होणार नाही यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. मुंजाबा वस्ती मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सतत संपर्कात असल्याने या परिसरातील जनता आपल्या १०० टक्के पाठीशी उभी राहील असा दावा शशिकांत टिंगरे यांनी केला. यावेळी परिवर्तन नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या पॅनल ला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून चारही नगरसेवक निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.















