भाजप मध्ये प्रवेश देऊ नका ; कार्यकर्त्यांची थेट संघाकडे तक्रार
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महानगर पालिका निवडणुक जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नव्याने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीची हमखास खात्री वाटत असल्याने भाजप मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. नवीन प्रवेश झाल्यास भाजप कडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याने इतर पक्षातील नवीन लोक पक्षात घेऊ नका यासाठी वडगावशेरी मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे शिष्ट मंडळ नुकतेच थेट मोदी बागेत गेले होते. संघामार्फत देखील पक्षाकडे विरोध दर्शविण्यात यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील मतदार संघातील माजी नगरसेवकांसह युवा नेते प्रयत्नशील आहेत. त्याला प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन, चार आणि पाच मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा नवीन प्रवेशास विरोध दर्शविला आहे. नुकतेच त्यांनी मोदी बागेतील संघाचे कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली आहे. त्या अगोदर पुण्यातील केंद्रीय मंत्री, उच्च तंत्र मंत्री, भाजपा शहर अध्यक्ष यांच्याकडे देखील उघड तक्रारी अर्ज देऊन नव्याने प्रवेश देऊ नये अशी विनंती केली होती. काहींना त्यांच्या प्रवेशा मुळे आपली उमेदवारी धोक्यात येत असल्याचे कारण दिले आहे. तर त्यांनी किती वेळा पक्ष बदलला आहे, हे देखील पटवून सांगत आहेत. तर काहीना पुढील विधान सभेचा धोका आताच वाटत आहे. एकंदरीतच मतदार वडगावशेरी संघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
वडगावशेरी मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते प्रवेशास विरोध करत असले तरी मेरीट नुसार वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाल्यास स्थानिक विरोध शेवट पर्यंत रहाणार की विरोध शांत होणार याबाबत देखील उलट सुलट चर्चा सुरू आहेत.















