प्रभाग १ मध्ये रेखाताई टिंगरे यांचा झंझावात; विजयाचा ‘चौकार’ मारून महापौर पदाकडे कूच!
विश्रांतवाडी : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी-लोहगाव) मध्ये माजी नगरसेविका सौ. रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सलग तीन वेळा जनतेचा विश्वास संपादन केल्यानंतर, यंदा त्या विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या अनुभवाची शिदोरी पाहता, यंदा त्यांना पुण्याच्या महापौर पदाची मोठी संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.
आपला नगरसेवक, पुण्याचा महापौर’ या भावनेने मतदार उत्साहात
प्रभाग १ मधील मतदारांमध्ये यंदा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. आपल्या भागातील कर्तबगार नेतृत्व पुण्याच्या ‘प्रथम नागरिक’ पदी विराजमान होणार, या कल्पनेने नागरिक भारावून गेले आहेत. “आपल्या भागातील नगरसेवक जर महापौर झाला, तर प्रभागातील विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटतील,” या खात्रीमुळे प्रभाग १ मधील मतदार रेखाताईंना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहेत.
सासर आणि माहेरच्या आशीर्वादाचे दुहेरी बळ
रेखाताईंसाठी हा प्रभाग म्हणजे सासर आणि माहेरचा सुवर्णसंगम आहे. कळस-धानोरी या सासरच्या जनतेने त्यांना आजवर तीनवेळा भरभरून प्रेम दिले आहे, तर आता लोहगाव हे त्यांचे माहेर प्रभागात समाविष्ट झाल्याने त्यांचे पारडे अधिक जड झाले आहे. “माहेरची मुलगी आणि सासरची सून” अशा दुहेरी नात्यातून मिळणारा जनतेचा आशीर्वाद त्यांना विजयाकडे घेऊन जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलच्या विजयाचा विश्वास
रेखाताईंनी केवळ स्वतःच्याच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर तीन उमेदवारांच्या विजयाचाही ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “मतदारांचा ओढा पाहता, आमचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. हे पॅनल केवळ कागदावर नसून ते जनतेच्या मनात आहे,”
असे त्यांनी नमूद केले. अनुभवी नेतृत्व आणि नवीन उमेदवारांची ऊर्जा यामुळे संपूर्ण पॅनल विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट दिसत आहे.
अनुभवाचा डोंगर आणि विकासाचा ‘रोल मॉडेल’
गेल्या १५ वर्षांत रेखाताईंनी कळस-धानोरी भागात उभारलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या, भाजी मंडई, उद्याने आणि अग्निशमन केंद्र ही कामे त्यांच्या विकासाच्या राजकारणाची साक्ष देतात. पती चंद्रकांत टिंगरे यांचा दांडगा जनसंपर्क आणि रेखाताईंचे कामाचे कौशल्य यामुळे लोहगावच्या विकासासाठी देखील त्यांनी आराखडा तयार केला आहे.
लोहगाव धानोरी कळस रस्ते, २४ तास पाणी आणि दर्जेदार मनपा रुग्णालये तसेच स्वच्छ व सुंदर प्रभाग उभारण्याचे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
महापौर पदाची संधी आणि प्रभागाचे उज्ज्वल भविष्य
पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ काम करण्याचा अनुभव रेखाताईंच्या पाठीशी आहे. त्यांची हीच क्षमता ओळखून पक्षाकडून त्यांना महापौर पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचे दाट संकेत आहेत.
ही संधी मिळाल्यास प्रभाग १ चा कायापालट तर होईलच, शिवाय संपूर्ण पुणे शहराला एक सक्षम महिला नेतृत्व मिळेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.















