प्रभाग तीन, चार, पाच ची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार : निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी
पहिल्या तासात उमेदवारी अर्ज संपले
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच ची महापालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार असून प्रत्येक उमेदवाराला समान संधी दिली जाईल तसेच निवडणूक कामकाज फिनिक्स मॉल शेजारील नवीन क्षेत्रीय कार्यालय येथे पार पडणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज वाटप करण्याच्या पहिल्या दिवशी अर्ज घेण्यासाठी विमान नगर मधील नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात गर्दी झाली होती. १०० अर्ज एका तासात संपल्यामुळे इच्छुकांनी गोंधळ केला. त्यानंतर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
नवीन क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कामकाजासंबंधी माहिती देताना जोशी म्हणाले की, २३ डिसेंबर पासून नामनिर्देशन फॉर्म देणे, स्वीकारणे याबाबतचे काम सुरु होत असून २३ ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. २५ व २८ डिसेंबरला सुट्टी असणार आहे. ३१ डिसेंबर रोजी छाननी होईल. उमेदवारी माघारीनंतर ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल. उमेदवारांना निवडणुकीच्या कामकाजासंबंधी एक खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल. एसएसटी भरारी पथके ३ तर व्हीएसटी भरारी पथके तीन असणार आहेत. इच्छुक उमेदवार, पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन इमारतीतच स्ट्राँग रूम व मतमोजणी
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारण्याचे काम करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही जागा योग्य असल्याने स्ट्राँग रूमसाठी सुरक्षितता याठिकाणी उभारली जाऊन संबंधित यंत्रणेच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करीत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी यांनी सांगितले.
विनापरवाना फ्लेक्स हटवून, कार्यक्रमांची परवानगी घ्यावी
निवडणुकीची आचारसंहीता लागू असल्याने अनेक ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स उमेदवारांकडून गल्ली बोळामध्ये असल्याच्या तक्रारी आल्या असून सदरचे फ्लेक्स हटविण्याबाबत भूषण जोशी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले असून निवडणुकीच्या कालावधीत कार्यक्रमांची, सभांची पूर्व परवानगी संबंधितांनी घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे फ्लेक्स हटविणे गरजेचे असून कार्यक्रमांची परवानगी न घेतल्यास कारवाई करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
एका तासात अर्ज संपले
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या. एका तासातच १०० अर्ज संपले. त्यामुळे अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा काही वेळानी अर्ज उपलब्ध करून दिले. दिवसभर सुमारे १९५ अर्जाची विक्री झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक सांगडे यांनी दिली.















