प्रभाग एक मध्ये बाहेरील उमेदवार का दिला?
स्थानिक परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात – मुळीक
पुणे : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गात भारतीय जनता पार्टी – आरपीआय आठवले गट युतीच्या माध्यमातून बाहेरील आयात उमेदवार दिल्याने इच्छुक एससी गटातील उमेदवार अद्याप नाराज आहेत. याबाबत माजी आमदार जगदीश मुळीक यांना पत्रकारांनी प्रभागाच्या बाहेरील उमेदवार का दिला असे विचारले असता, परिस्थिती नुसार काही निर्णय घ्यावे लागतात, सदर जागा आरपीआयच्या वाट्याला गेल्याने त्या पक्षाने घेतलेला तो निर्णय असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
प्रभाग एक मधून एससी गटातून भाजपा कडून माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, मीनाताई इंगुळकर-माने, रुपाली दिलीप राखपसरे, सुरेखा रावसाहेब राखपसरे, वैशाली जितेंद्र जगताप यासह अनेक जण इच्छुक होते. या सर्वांना डावलून प्रभाग क्रमांक तीन मधील माजी नगरसेवक राहुल भंडारे यांच्या पत्नी अश्विनी भंडारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एससी गटातील इच्छुक अद्यापही नाराज आहेत. यातील काही बंडखोरी करत इतर पक्षातून निवडणूक लढवित आहेत. तर काहींनी माघार घेतली असली तरी अद्यापही प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत. बाहेरील उमेदवार आयात केल्याबाबत अनेकांनी उघड – उघड अशी नाराजी व्यक्त केली आहे. धानोरीतील भैरवनाथ मंदिरात भाजपाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या माजी आमदार जगदीश मुळीक यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता सदर जागा आरपीआय गटाला गेली असून आरपीआयच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागत असल्याचे मुळीक यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, एससी गटातील इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची भाजपा तसेच उमेदवार नाराजी दूर करणार की त्यांच्या नाराजीचा फायदा इतर पक्षातील उमेदवारांना होणार याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.















