दुकानात काम करणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी
हल्ला करणाऱ्यांना लोहगाव पोलिसांनी केली अटक
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या रागातून इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना लोहगाव मधील दादाची वस्ती चौकात घडली. यामधील तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुरुद्वारा कॉलनी मधील टोळक्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा जगताप यांनी दिली.
अनिल लक्ष्मण भोगिले, (वय १८ वर्ष, आर्या इलेक्ट्रानिक दुकानामधील कामगार, रा. लेन क्र.२, शुभम मंगल कार्यालयाचे पाठीमागे, संतनगर, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारी वरून यश ओव्हाळ, आकाश मोरे, मानव ओव्हाळ, आर्यन दाडोरे (सर्व रा. लोहगाव) यासह मारहाण करणाऱ्या इतर संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.


याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल भोगिले हा दि.३० जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याचे सुमारास आर्या इलेक्ट्रानिक, आदर्श नगरची कमान, दादाची वस्ती, लोहगाव येथील दुकानामध्ये खुर्चीवर बसलेला असताना यश ओव्हाळ, आकाश मोरे, मानव ओव्हाळ, आर्यन दाडोरे यासह इतर तरुणांनी संगनमताने पुर्वीचे भांडणाचे कारणावरून अनिल यास हाताने लाथा बुक्यांने व लोखंडी धारधार हत्याराने अनिलच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले आहे. दरम्यान दादाची वस्ती मुख्य चौकात अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, अचानक सहा ते सात जणांचे टोळके हातात कोयते घेऊन इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरले. त्यांनी अनिल ला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांच्या हातात कोयते होते. त्यांनी कोयत्याने वार केले. आरडाओरड झाल्याने मारहाण करणारे सुमारे सहा ते सात जण तरुण पळून गेले..
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील म्हणाल्या, मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले असून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे करत आहेत.














