ज्वेलरी शॉप चालकांना बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणा-यास अटक
लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी
पीएनजी ज्वेलर्स शाखा, विमाननगर या शॉपमधुन एका इसमाने बनावट अंगठी ट्रे मध्ये ठेवुन हातचलाखीने एक लाख रुपये किंमतीची सोन्याची खरी अंगठी चोरी केल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांचे आदेशान्वये, तपास पथकाला सदर इसमाचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विमानतळ तपास पथकातील स्टाफने घटनास्थळापासुन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपीचा माग काढला होता. पी. एन. जी. ज्वेलर्स शाखा औंध येथे अशा प्रकारे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे नमुद आरोपी यास ताब्यात घेण्यात आलेले असुन, त्याचे नाव सैफ दिलीप बेळगावकर (वय २९ वर्षे रा. शाहीद हकीम यांचेकडे भाड्याने, गल्ली नं ०५, केदारेनगर, वानवडी) असे आहे. त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन एक लाख रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपीने अशा प्रकारे ब-याच सराफा व्यवसायीकांना फसवल्याची माहिती मिळाली असुन त्या अनुशंगाने तपास चालु आहे.
सदरची कारवाई आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, शंकर वाघुले यांचे पथकाने केली आहे.














