ज्यांनी पक्ष प्रवेशाला विरोध केला त्यांचीच सुरेंद्र पठारे यांनी घेतली भेट
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेश होऊ नये असा विरोध करणाऱ्या माजी आमदार जगदीश मुळीक यांची नुकतीच सुरेंद्र पठारे यांनी मुळीक यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद साधला.
माजी आमदार मुळीक व त्यांच्या समर्थक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सुरेंद्र पठारे यांना भाजपामध्ये घेऊ नका यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न केले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासह वेगवेगळ्या ठिकाणी मुळीक यांनी समर्थकांसह जाऊन विरोध दर्शविला होता. मात्र त्यांच्या या विरोधाला न जुमानता सुरेंद्र पठारे यांचा भारतीय जनता पार्टीत वरिष्ठ नेतृत्वाने अखेर प्रवेश करून घेतला. सध्यातरी वडगावशेरी मतदार संघात केंद्रिय राज्यमंत्री मोहोळ गट आणि दुसरा मुळीक असे दोन गट पडले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी देताना मुळीक गट सरस ठरतो की मोहोळ गट हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. पठारे यांना निवडणुकीत मुळीक मदत करणार की काय होणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे.















