गोल्ड मेडल विजेता सनी फुलमाळी यास अशोकबापू खांदवे यांनी केली आर्थिक मदत
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
बहिरन देशात झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत भारताकडून खेळणाऱ्या लोहगाव मधील सनी फुलमाळी याने सुवर्ण पदक मिळविले आहे. आर्थिक परिस्थिती वर मात करून लोहगाव ते बहिरन देशा पर्यंत कुस्ती खेळणाऱ्या १७ वर्षीय वयोगट व ६० किलो वजनी गटातील आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता सनी सुभाष फुलमाळी याचा प्रवास थक्क करणारा असा आहे. त्याची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यास बक्षीस म्हणून हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती अशोकबापू खांदवे यांनी ५ हजार रुपये बक्षीस देऊन विशेष सन्मान केला.
पै. सनी फुलमाळी याचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील आष्टी येथील आहे. हे कुटुंबीय मागील पंधरा वर्षांपासून लोहगाव मध्ये रहायला आहेत. फुलमाळी परिवाराचा मूळचा परंपरागत व्यवसाय हा नंदीबैल घेऊन दारोदारी फिरून त्यावर उपजीविका करणे हा आहे. तर सनी ची आई, बहीण सुई, दोरा, टिकल्या, कानातील असे विकतात. मोठा भाऊ शिक्षण घेत आहे. याच कुटुंबात वाढलेल्या सनी हा कुस्ती खेळात तरबेज होता. ही चुणूक ओळखून लोहगाव मधील रायबा तालीम मध्ये पै. सोमनाथ मोझे, पै. सदा राखपसरे यांनी सनी ला कुस्ती चे धडे देण्यास सुरवात केली. त्याचे कुस्ती तील डावपेच ओळखून त्याला खेळण्यासाठी लोणीकंद येथील जाणता राजा तालमीत संदीप भोंडवे यांच्या तालमीत पाठविला. सनी ची परिस्थिती पाहून संदीप भोंडवे हे संपूर्ण त्याचा खर्च करत आहेत.
यावेळी बोलताना गोल्ड मेडल विजेता सनी फुलमाळी म्हणाला, आपल्या कामगिरीची सर्व प्रथम लोहगाव टाईम्स ने दखल घेतली. त्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला तर काहींनी सत्कार केला. आमदार बापुसाहेब पठारे, अशोकबापू खांदवे यांनी केलेल्या आर्थिक मदतीने कुटुंब चालण्यास हातभार लागला. त्यामुळे त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
हवेली तालुका माजी पंचायत समिती सभापती अशोकबापू खांदवे म्हणाले, सनी याने लोहगावचे नाव देशात नाही तर जगभरात पोहोचविले आहे. लोहगाव कराना त्याचा खूप अभिमान आणि आनंद आहे. सनी ला ज्या ज्या वेळी मदत लागेल त्या त्या वेळी आपण करणार असल्याचे आश्वासन अशोकबापू खांदवे यांनी दिले.

















