आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने प्रमुख पदांवर नियुक्ती करताना अनेकदा अनपेक्षित निर्णय घेत धक्कातंत्र वापरल्याचा अनुभव राज्याच्या राजकारणात यापूर्वीही आहे. पुणे महापालिकेच्या महापौर पदाबाबतही भाजप असाच धक्का देण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चचा सुरू झाली आहे. यंदा पुणे महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर भाजपमधील काही निष्ठावंत नगरसेविकांची नावे पुढे येत असतानाच अचानक ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. पुण्याची ओळख आयटी शहर म्हणून आहे. त्यामुळे महापौर पदासाठी आयटी चेहरा, राजकीय वारसा असलेल्या आणि उपनगरातून येणाऱ्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचे नाव आघाडीवर आहे.
मुंबईत झालेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षण सोडतीत पुण्यासाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर भाजपमधील मंजुषा नागपुरे, निवेदिता एकबोटे, मंजुश्री खर्डेकर, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर, यांसारख्या अनुभवी नगरसेविकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आली. मात्र राजकीय समीकरणे वेगळी वळण घेऊ लागली आणि वडगाव शेरी मतदारसंघात ८ नगरसेवक निवडून आणणाऱ्या पठारे कुटुंबातील ऐश्वर्या पठारे यांचे नाव अचानक आघाडीवर आले आहे.
ऐश्वर्या पठारे या विमाननगर-लोहगाव- वाघोली या प्रभागातून निवडून आल्या असून त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांची स्वतःची आयटी कंपनी आहे. त्यांचे पती सुरेंद्र पठारे हे ही प्रभाग क्रमांक ४ खराडी – वाघोली मधून नगरसेवक आहेत, तर सासरे बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने सुरेंद्र पठारे यांना प्रभाग क्रमांक ४ मधून तर ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी जाहीर केल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र या दोघांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत टीकाकारांना विजयातून उत्तर दिले होते. दोन्ही प्रभागातील ८ जण नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी महिला आरक्षण निश्चित झाल्याने भाजपच्या पहिल्या फळीतील गणेश बीडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, राजेंद्र शिळीमकर, किरण दगडे, योगेश मुळीक, अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांसारख्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. महापौरपदावर आपली वर्णी लागेल या अपेक्षेने बसलेल्या अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. आता प्रश्न इतकाच उरतो की, भाजप पुण्यातही आपली ‘धक्कातंत्राची’ परंपरा कायम ठेवत ऐश्वर्या पठारे यांना महापौरपदाची संधी देणार का, की पक्षातील निष्ठावंत महिला नगरसेविकांनाच प्राधान्य दिले जाणार? या निर्णयाकडे संपूर्ण पुण्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे. ऐश्वर्या पठारे यांच्या नावाचा विचार करताना त्यांच्या जमेच्या काही बाजू आहेत. त्यामुळे पठारे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
















