आकाश कंदील लावताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू; ऐन दिवाळीत वडगावशेरीवर शोककळा
वडगाव शेरी : प्रतिनिधी
नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळाने बनवलेला दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा फांदी तुटून खाली पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. सदर तरुण हा मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे वडगावशेरी परिसरावर शोककळा पसरली आहे.संतोष किसन कुसाळ (वय 45, राहणार गणेशनगर, वडगावशेरी) असे आकस्मिक अपघाती निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रतेज तरुण मंडळाचे संतोष हे सक्रिय कार्यकर्ते होते. काल (शनिवारी) दिवसभर मंडळांच्या सदस्यांसोबत त्यांनी किल्ला बनवला. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बनवलेला मोठा आकाश कंदील रस्त्यावर लावण्यासाठी माऊली मंदिरा समोरील उंबराच्या झाडावर ते रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चढले. दोरी बांधत असताना झाडाची फांदी तुटून ते डोक्यावर जमिनीवर पडले. त्यांना जखमी अवस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पहाटे त्यांचे दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.
दिवाळीचा सण साजरा होत असताना एका होतकरू कार्यकर्त्याचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे संपूर्ण वडगावशेरी परिसरावर शोककळा पसरली आहे. मंडळाचे अध्यक्ष रितेश नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. संतोष हे येरवडा येथील शहा एक्सीडेंट हॉस्पिटल येथे नोकरीला होते. याप्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
फोटो: संतोष किसन कुसाळ














