अशोकबापू खांदवे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
प्रभाग एक व तीन मधील भाजपा उमेदवारांना मिळणार ताकद
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, लोहगाव मधील स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले ज्येष्ठ नेते अशोकबापू खांदवे यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपा उमेदवारांना अधिक ताकद मिळणार आहे.
लोहगाव मधील एक मोठे प्रस्थ म्हणून अशोकबापु खांदवे ओळखले जातात. त्यांनी ग्राम पंचायत सदस्या पासून ते हवेली तालुका पंचायत समिती सभापती पदापर्यंत मजल मारली आहे. राजकारणा सोबत ते व्यवसायामध्ये यशस्वी आहेत. भारतीय जनता पार्टी कडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला होता. दरम्यान अशोकबापू हे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी केलेल्या आग्रहामुळे तसेच प्रभाग तीन आणि एक मधील उमेदवारांना मदत करण्यासाठी अशोकबापू खांदवे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत दासआप्पा खांदवे यांनी देखील प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे उपस्थित होते.
अशोक बापू यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारात पदयात्रेत सहभागी झाले पठारे वस्ती, शंभू पार्क, सोपान नगर, पवार वस्ती, काळभोर वस्ती या ठिकाणी अशोक बापू खांदवे यांच्यासह उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये फुलांच्या वर्षात जोरदार स्वागत करण्यात आले. एकंदरीतच भाजपा उमेदवारांना अशोक बापूंच्या प्रवेशामुळे अधिक बळ मिळाले आहे.
यावेळी बोलताना अशोकबापू खांदवे म्हणाले, मंत्री चंद्रकानदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर स्वर्गीय प्रताप दादा खांदवे यांच्या घराण्याशी आपला स्नेह कायम आहे. प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व उमेदवारांनी आपल्या पंचायत समितीच्या काळात मदत केली होती. त्यांना या भागातून अधिक मताधिक्य देऊन आपण देखील मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भाजपा नेत्यांनी आपल्या पदानुसार योग्य राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अशोकबापु खांदवे यांनी सांगितले.
फोटो: लोहगाव मधील हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.















