अजितदादांचा शब्द आणि अशोकबापू थांबले..!
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे यांना त्यांच्या पत्नी सुशिला अशोक खांदवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. शेवट पर्यंत त्यांचें नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले. नाराज झालेल्या अशोकबापू खांदवे यांनी आपला व पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते अपक्ष निवडणूक लढण्यास तयार होते, मात्र अर्ज मागे घेण्याचा दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन आल्याने आपले योग्य राजकीय पुनवर्सन केले जाईल असा शब्द दादानी दिल्याने अशोकबापू खांदवे यांनी शेवटच्या क्षणी पावणेतीन वाजता उमेदवारी अर्ज माघार घेतला.
अशोकबापू खांदवे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू ठेवली होती. ते स्वतः किंवा महिला उमेदवार देण्यास तयार होते. गाठी भेटी सुरू होत्या. त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत मतदारांशी संपर्क ठेवला होता. भाजपा कडून उमेदवारीची शक्यता कमी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची खात्री होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला. ते स्वतः रमेश तळेकर, जयश्री सातव असे मिळून स्ट्रॉंग पॅनल देण्याचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय झाला. तशी तयारीही सुरू होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अशोकबापू खांदवे यांना फोन आला. त्यांनी त्यांना जिल्हा नियोजन समितीवर घेण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे अशोकबापू अर्ज मागे घेण्यास तयार झाले आणि त्यांनी अखेर दादांच्या शब्दाखातर उमेदवारी अर्ज मागे घेतला. अखेर त्यांचे बंड शांत झाले. अशोकबापू सोबत अर्जुन गरुड, रमेश तळेकर, जयश्री सातव यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.















