बनावट एफडीआर प्रकरणी अखेर ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
सरकारी बँकेचे खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या (एफडीआर) सादर करून महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर अखेर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदारास ताब्यात घेतल्यानंतर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कागदपत्रे कोठून तयार केली, यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची महत्वाची माहिती तपासात पुढे येणार आहे.
सलीम गाजीबक्ष बांगी (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, सध्या रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे आणि पालिका, बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कनिष्ठ अभियंता माधुरी ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निविदा मिळविण्यासाठी आरोपी बांगी याने युनियन बँकेच्या वीस लाख रुपयांच्या
बनावट मुदत ठेव पावत्या पालिकेला सादर केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाखा प्रमुख शशी साटोटे यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. लोहगाव टाईम्स सह अनेक माध्यमांनीही हे प्रकरण लावून धरले होते. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर चौकशी झाल्यावर ठेकेदाराने बनावट मुदत ठेव पावत्या देऊन पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोषी ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून पाच कामांची बयाणा रक्कम जप्त करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावे, असे आदेश दिले होते. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. अखेर आठ दिवसांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या ठेकेदारावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान म्हणाले,
खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या आरोपीवर कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ठेकेदार अटक झाल्यावर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कोठे तयार केली, यामध्ये कोणाचा हात आहे, तसेच आणखी किती लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिली, हे तपासात पुढे येऊ शकेल.















