येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण; शिवसेनेने आंदोलन करून केला प्रशासनाचा निषेध
येरवडा : प्रतिनिधी
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातून रोज नवनवीन भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर येत असून याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. विकास कामांतील अनियमितता, अपारदर्शकता, कनिष्ठ अभियंत्यांच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर आंदोलन करून उप अभियंता चंद्रसेन नागटिळक यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आंदोलनात शिवसेनेचे उपशहरप्रमुख मंदार उर्फ आबा निकम, संजय वाल्हेकर, संजय भालेराव, दिपक चावरिया, शिवदूत संजय लोहोट, प्रकाश निकम, राहुल शेडगे, शकिल सावंत, राजेश वाल्हेकर, शशिकांत साटोटे यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना साटोटे म्हणाले, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अभियंत्यांच्या मनमानी कारभार सुरू आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील खोटे एफडीआर सह अनेक वेगवेगळ्या प्रकरणांचा विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या बातम्यांचा फ्लेक्स बनवून शिवसेनेने विविध मागण्या केल्या.

रोज एक भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. करातून (टॅक्स) होणाऱ्या विकास कामांमध्ये अधिकारी वर्गाकडून निष्काळजीपणा होताना दिसत आहे. कनिष्ठ अभियंत्यांचा कारभार एकाधिकार शाहीचा आहे. कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. कोणती कामे कुठे केली जात आहेत, याबाबत विचारणा केल्यास माहिती दिली जात नाही आणि माहिती न देण्यामागे काय कारण असावे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विकास कामात ‘थर्ड पार्टी’ नियंत्रण न लावता, मटेरियल टेस्टिंग न करता, लॅब रिपोर्ट न घेता आणि लेबर ॲक्टनुसार कामे न करता संशयास्पद पद्धतीने कामे सुरू असल्याचा आरोप केला.
उपशहरप्रमुख आबा निकम यांनी प्रशासनाला इशारा दिला की, खोटे एफडीआर, बँक सॉल्वन्सी मध्ये अधिकारी दोषी आहेत. त्यांचा निष्काळजी पना स्पष्टपणे दिसून येत असून अधिकाऱ्याना विनाकारण पाठिशी न घालता, जर दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर त्वरित कारवाई झाली नाही, तर शिवसेना (उबाठा) पक्ष हे आंदोलन अधिक तीव्र करेल असा इशारा दिला.
सहायक महापालिका आयुक्त जागेवर नसल्याने उपअभियंता नागटिळक यांनी निवेदन स्वीकारून तक्रारी आल्यानुसार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खोट्या एफडीआर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. शिवसेनेने केलेल्या मागण्याचा विचार करून कारवाई केली जाईल.















