येरवड्यात महिलेचा खून करून लोहगावात आणून फेकला ; बाप लेकास पोलिसांनी केले गजाआड
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
लोहगाव स्मशानभूमी जवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्या महिलेचा सराईत गुन्हेगाराने वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर प्रियकराने तीन दिवस मृतदेह घरात लपून ठेवला होता. घरात आणि शेजारी दुर्गंधी सुटल्यावर आरोपी मुलाने वडिलांच्या मदतीने मृतदेह रिक्षात टाकून मंगळवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे लोहगावात फेकला होता. पोलिसांनी बाप लेकास येरवड्यातून अटक केली आहे.
विमानतळ तपास पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून येरवड्यातील आरोपींच्या घराचा माग काढला. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते. रवी रमेश साबळे (वय ३०) आणि रमेश साबळे (वय ६३, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. सुवर्णा (वय अंदाजे ४०,पूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लोहगाव स्मशान भूमीजवळ मंगळवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर दिवे बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसून आली. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा मार्गांची पाहणी करून रिक्षाची ओळख पटवण्यात आली. येरवड्यातील यशवंतनगर भागात गेल्यावर पोलिस आरोपींच्या घरात पोहोचले. आरोपी वडील आणि मुलाला ताब्यात घेऊन त्यांना ठाण्यात आणले. रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा आणि २० इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा घटस्फोट झाला असून, दोन मुले आहेत. वडील रिक्षाचालक आहेत. खुनाची घटना येरवडा भागात घडल्याने गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कारवाई आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, योगेश थोपटे, हरीप्रसाद पुंडे, ज्ञानेश्वर आवारी, लालु क-हे, गणेश इथापे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, पांडुरंग म्हस्के, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, अंकुश जोगदंडे, शैलेश नाईक, शंकर वाघुले, सचिन जगदाळे, बबलु भिसे यांचे पथकाने केली आहे.
ओळ: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाप लेकाने विमानतळ पोलीसानी अटक केली.














