लोहगावात फेकलेल्या महिलेच्या खुनातील आरोपी येरवड्यातील
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
लोहगाव स्मशानभूमी जवळील गुरुद्वारा परिसरात आढळून आलेल्या महिलेचा सराईत गुन्हेगाराने वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर प्रियकराने तीन दिवस मृतदेह घरात लपून ठेवला होता. घरात आणि शेजारी दुर्गंधी सुटल्यावर आरोपी मुलाने वडिलांच्या मदतीने मृतदेह रिक्षात टाकून मंगळवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे लोहगावात फेकला होता. पोलिसांनी बाप लेकास येरवड्यातून अटक केली आहे.
विमानतळ तपास पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून येरवड्यातील आरोपींच्या घराचा माग काढला. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते. रवी रमेश साबळे (वय ३०) आणि रमेश साबळे (वय ६३, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. सुवर्णा (पूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लोहगाव स्मशान भूमीजवळ मंगळवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर दिवे बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसून आली. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा मार्गांची पाहणी करून रिक्षाची ओळख पटवण्यात आली. येरवड्यातील यशवंतनगर भागात गेल्यावर पोलिस आरोपींच्या घरात पोहोचले. आरोपी वडील आणि मुलाला ताब्यात घेऊन त्यांना ठाण्यात आणले. रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा आणि २० इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा घटस्फोट झाला असून, दोन मुले आहेत. वडील रिक्षाचालक आहेत. खुनाची घटना येरवडा भागात घडल्याने गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
फोटो: सोबत
ओळ: लोहगाव मधील गुरुद्वारा परिसरात मंगळवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.














