लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
व्हॉट्स अपवर एपीके फाईल पाठवुन व्हॉट्स अप व क्रेडिट कार्ड हॅक करुन फ्लिप कार्डवरुन मोबाईल खरेदी करणा-या परराज्यातील सायबर चोरट्यांना वाघोली पोलीस स्टेशनचे सायबर शाखेने अटक करून १२ लाख रुपये किंमतीचे ४५ मोबाईल जप्त केले.
करिमुल खुसममुद अली इस्लाम (वय 32 वर्षे, व्यवसाय रा- कॉसमिक कोटीयार्ड, वाघोली, पुणे, मुळ रा. आसाम) यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड हॅक करून 1 लाख 6 हजार 885 रुपये किंमतीचा मोबाईल फोन प्लिफ कार्डवरुन खरेदी केल्याची अज्ञात व्यक्ती विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अधिक चौकशी करून अस्लम मोफिद खान (वय २२ वर्षे रा. मु.पो. मिवुर ता. चैनपुर जि. कैमुर बिहार. सध्या रा. काळुबाईनगर, वाघोली) आदिब रिझवान खान (वय २१ वर्षे रा. सुरत, गुजरात) या दोघांना अटक केली आहे.
दाखल गुन्हयाचा तपास वाघोली पोलीस करत असताना क्रेडिट कार्ड वरून मागविलेल्या मोबाईल फोनची डिलीव्हरी वाघोली केसनंद रोड, प्रिन्स मेडिकल, वाघोली पुणे येथे झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाघोली येथील फ्लिप कार्ड च्या ऑफिसला जावुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला. मोबाईल फोनची डिलीव्हरी रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीचा फोटो प्राप्त झाला. त्या फोटोचे आधारे पोलिसांनी काळुबाईनगर, वाघोली येथील संशयित आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे अस्लम खान, आदिब खान आढळून आले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आरोपी आदिब खान हा सुरत येथुन विमानाने येवुन साथीदार अस्लम खान याचे मदतीने खरेदी केलेले मोबाईलची डिलीव्हरी घेवुन ते सुरत येथे नेवुन फरहान इब्राहीम ऊनवाला (वय २५ वर्षे रा. मेमन अपार्टमेंट, फ्लॅट नंबर २०१, कलमगल्ली चौकबाजार, सुरत, गुजरात) येथे विक्री करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. दाखल गुन्हयातील आरोपी १२ लाख रुपये किंमतीचे ४५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. अधिक तपास उप निरीक्षक आसाराम शेटे करत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे आसाराम शेटे, उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, सायबर पथकाचे अमंलदार रमेश साबळे, किरण अब्दागीरे, विष्णु सरवदे, सतिश बिरादार, वृंदाविनी चव्हाण यांनी केली.














