लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगावमध्ये ३८१ हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्या खालोखाल प्रभाग ३४ नन्हे- वडगाव बुद्रुकमध्ये २७८ आणि प्रभाग १५ मांजरी बुद्रुक -साडेसतरा नळीमध्ये २२४ हरकती सूचना आल्या आहेत. लोहगाव मधून गावठाण एकत्र ठेवावे, सोमनाथ नगर चा भाग कट करावा, महसुली गाव एकत्र ठेवावे अशा स्वरूपाच्या हरकती अधिक आहेत.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचना भाजप, शिवसेना शिंदे गटाला अनुकूल झाल्याचा आरोप केला जात आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत एक हजार ३८२ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. एका दिवसात ७८५ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षात ४१ प्रभागांमधील ८ प्रभागांमध्ये एकही हरकत दाखल झालेली नाही. या हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची मुदत राहिली आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. पालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला होता; पण उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळली आहेत. पालिकेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे.
एकही हरकत नसलेले प्रभाग पुढीलप्रमाणे
प्रभाग ५ कल्याणी नगर – वडगावशेरी, प्रभाग १० बावधन – भुसारी कॉलनी, प्रभाग १२ छत्रपती शिवाजीनगर -मॉडेल कॉलनी, प्रभाग २५ शनिवारपेठ-महात्मा फुले मंडई, प्रभाग २९ डेक्कन जिमखाना – हॅपी कॉलनी, प्रभाग ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी, प्रभाग ३१ मयूर कॉलनी – कोथरूड, प्रभाग ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी याचा समावेश आहे.
लोहगाव मधून हरकती घेणे साठी राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे मास्तर, सोमनाथ उर्फ बाळासाहेब खांदवे, प्रमोद काळे, सोमनाथ खांदवे, श्रीकांत खांदवे, निखिल खांदवे, संतोष खांदवे, काळुराम साठे, अमोल पवार यासह नागरिक उपस्थित होते.















