लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छाद
महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. लोहगाव मधील दिपाली अशोक तनपुरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र (दिनांक १९ फेब्रुवारी) रोजी दुपारी चोरून नेले होते. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी आज (दिनांक २० फेब्रुवारी) रोजी वाघोली रस्त्यावरील सातव वस्ती या ठिकाणी मनीषा अर्जुन खरमाटे (वय २९) या पायी जात असताना पाण्याच्या टाकीजवळ मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. दिपाली तनपुरे यांचे ४ ग्रॅम वजनाचे तर खरमाटे यांचे १ तोळे वजनाचे दागिने चोरले. दरम्यान (दिनांक २०) रोजी लोहगाव मधील माळवाडी परिसरात त्याच दुचाकीवरील चोरांनी शाळेतून पायी घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. दुचाकी वरील या दोघा चोरट्यांनी लोहगाव/ वाघोली परिसरात उच्छाद मांडला असून पोलिसांना आव्हान देत भर दुपारी पायी जाणाऱ्या महिलाना हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरत आहेत. पोलीसानी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी केली आहे.















