दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल
आरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने
वडगावशेरी : प्रतिनिधी
लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ॲाफ टेक्नॅालॅाजी (एमएमआयटी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. यातील काही मुलींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर अद्यापही तीन मुली रुग्णालयात उपचार घेत आहेत. वस्तीगृहातील मुलींनी घटना घडण्याच्या अगोदर प्राचार्य, उप प्राचार्य यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र तरीही काही उपाय योजना झाल्या नसल्याने मुलींना चक्कर येणे, उलट्या येणे प्रकार घडले होते. प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला.
विद्यार्थिनींशी संवाद साधला असता, त्यांनी कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. विद्यार्थिनींनी सांगितले की, “आम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या फिल्टरमधून पिवळसर आणि घाण पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी आम्ही पाण्याच्या टाकीत आणि बादलीत काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॅालेज प्रशासनाला दाखवले, त्याबाबत तक्रारही केली, तरी कोणतीही कारवाई केली नाही.”
“जानेवारी महिन्यातच आम्ही दुषीत पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. फिल्टर बदललाच नव्हता. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
दरम्यान या घटनेबाबत वृत्त पत्रात बातम्या प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाची टीम आरोग्य अधिकारी डॉ नीना बोरुडे, मोनिका दलाल, डॉ संतोष मुळे, डॉ चकोर यांनी कॉलेज मध्ये भेट देऊन पाहणी केली. मुलींच्या वसतिगृहात देखील पाहणी केली. वसतिगृहातील सोयी सुविधा बाबत चर्चा केली. पाण्याचे नमुने तपासणी साठी घेण्यात पाठविण्यात आले आहेत.
याबाबत डॉ चकोर म्हणाले, पाण्याचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.














