एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;
कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ॲाफ टेक्नॅालॅाजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर सध्या साईश्रद्धा हॉस्पिटल लोहगाव येथे उपचार सुरू असून, कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा संताप विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे. मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रुग्णालयात जाऊन बाधीत विद्यार्थिनींशी संवाद साधला असता त्यांनी कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. विद्यार्थिनींनी सांगितले की, “आम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या फिल्टरमधून पिवळसर आणि घाण पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी आम्ही पाण्याच्या टाकीत आणि बादलीत काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॅालेज प्रशासनाला दाखवले, त्याबाबत तक्रारही केली, तरी कोणतीही कारवाई केली नाही.”
“जानेवारी महिन्यातच आम्ही दुषीत पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. फिल्टर बदललाच नव्हता. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत. जेंव्हा आम्ही फिल्टर उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला ‘तुम्ही कोण विचारणार? तुम्हाला तो अधिकार नाही’ असे म्हणून गप्प करण्यात आले.”
विद्यार्थिनींच्या जीवीत्वाशी खेळ: चक्कर येऊन पडल्या मुली –
विषबाधेची तीव्रता इतकी होती की, विद्यार्थिनी वसतीगृातच चक्कर येऊन पडू लागल्या. चालता बोलता विद्यार्थिनी खाली पडत असल्याने एकच खळबळ उडाली. काही दिवसापूर्वी विद्यार्थिनींनी स्वत: दवाखान्यात जाऊन तपासणी केली, सलाईनही घेतले, परंतू वसतिगृहात परत गेल्यावर पुन्हा त्रास सुरू झाला,” धक्कादायक बाब म्हणजे, हा कॅालेज परिसर सुनसान आहे. तेथे वाहतुकीची वर्दळ नसते. मुलींना त्रास होत असतानाही कॉलेज प्रशासनाने वेळेवर रुग्णवाहिका किंवा स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली नाही. मुलींना खाजगी वाहनाने किंवा एकमेकींच्या मदतीने रुग्णालयात जावे लागले.

पालकांचा संताप आणि कारवाईची मागणी-
या घटनेनंतर लोहगाव परिसरात खळबळ उडाली असून महाराष्ट्र भरातून आलेल्या पालकांनी दवाखान्यात धाव घेतली आहे. पालकांची प्रतिक्रिया घेतली असता वसतिगृहात सुरू असलेले बांधकाम यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही, डिसेंबर-जानेवारीत परिक्षा होत्या. प्रवेश घेताना तीन महिन्यात बांधकाम उरकेल असे सांगितले परंतू बांधकामाचा करारच १२-१३ महिन्यांचा असल्याचे कळाले. रात्री-अपरात्री होणारा आवाज आणि पिण्याच्या पाण्याची दुरवस्था यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुषित पाण्याबाबत मुलींनी तक्रार केली असता प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. या प्रकरणी प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

या संदर्भात कॉलेजच्या प्राचार्य रूपेश भोरटाके यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाणी किंवा अन्नातून विष बाधा झाली असावी. याबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले.
सदर विद्यार्थ्यांनी काल रात्री उलट्या चक्कर येत असल्याने ॲडमीट झाल्या आहेत. त्यांचे सोनोग्राफी, रक्तचाचणीचा रिपोर्ट आले आहेत. सध्या सगळ्या विद्यार्थीनी नॅार्मल आहेत त्या जनरल वॅार्डमध्ये उपचार घेत आहेत.
डॅा. विकास गायकवाड, साईश्रद्धा हॅास्पिटल
सदर घडलेली घटना निष्काळजीपणाचा कळस आहे. अशी घटना विद्यार्थीनींच्या जीवावर बेतू शकते. कॅालेज प्रशासनाने दोष सिद्ध करून कारवाई करावी व जीवीत्वाशी खेळू नये. भविष्यात योग्य ती काळजी घ्यावी.
अनिल (बॅाबी) टिंगरे, नगरसेवक पुणे मनपा
वसतिगृहात विषबाधा होऊन रुग्णालयात भरती असलेल्या अभियांत्रिकीच्या मुलींची नांवे..
श्रेणी महाडिक (प्रथम वर्ष) – चिपळूण
रुणाली महाजन (प्रथम वर्ष)- जळगाव
श्रीनिधी गुप्ता (द्वितीय वर्ष)- नागपूर
साक्षी स्वामी (द्वितीय वर्ष)- अहिल्यानगर
सिद्धी उमाटे (प्रथम वर्ष)- लातूर
श्रेयश इरकर (प्रथम वर्ष)- धाराशिव
मानसी देशमुख (प्रथम वर्ष)-परभणी
कुनिका देवळकर (प्रथम वर्ष)- चंद्रपूर
कमलेश निकम (प्रथम वर्ष)- चाळीसगाव
अत्यवस्थ मुलींची नांवे-
तृप्ती गावंडे (प्रथम वर्ष) – संभाजीनगर
प्रणया चव्हाण (प्रथम वर्ष)- कारंजा
समृद्धी हांडे (प्रथम वर्ष)- जुन्नर














