धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!
पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज जरी आधुनिकतेच्या प्रवाहात वेगाने धावत असले, तरी या गावाची नाळ आजही आपल्या परंपरेशी घट्ट जोडलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे धानोरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज! दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी काळभैरवनाथांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा उत्सव म्हणजे केवळ एक प्रथा नसून, तो संपूर्ण धानोरीकरांच्या श्रद्धेचा आणि एकतेचा मानबिंदू आहे.
धनाची नगरी आणि भैरवनाथांची कृपा
खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ‘धानोरी ही धनाची नगरी’ आहे. या नगरीत वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक भक्तावर आणि रहिवाशावर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांची मोठी कृपा आहे. त्यांच्याच कृपाशीर्वादामुळे आज या परिसराला सुख-समृद्धी लाभली आहे. जो कोणी या नगरीत भक्तीभावाने येतो आणि महाराजांच्या चरणी लीन होतो, त्याला आयुष्यात उत्कर्ष आणि समाधानाची प्राप्ती होते, अशी समस्त भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
९ फेब्रुवारी: भक्तीचा थाट आणि सांस्कृतिक मेजवानी
सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी होणारा पालखी सोहळा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण! या निमित्ताने घरोघरी पै-पाहुण्यांना आदरपूर्वक निमंत्रण दिले जाते. “आमच्या काळभैरवनाथांचा उरूस आहे, दर्शनाला आणि जेवायला नक्की या,” असा आग्रह प्रत्येक घरातून धरला जातो. देवदर्शन घेतल्यावर होणाऱ्या खास जेवणावळींमुळे नातेसंबंधांमधील जिव्हाळा अधिक वाढतो. याचबरोबर, लोकसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहुण्यांच्या मनोरंजनासोबतच आपल्या समृद्ध कलेचे जतन करते. जुन्या काळची ही आदरातिथ्याची पद्धत आजही धानोरीकरांनी तितक्याच आपुलकीने जपली आहे.
१० फेब्रुवारी: कुस्त्यांचे भव्य मैदान
उरसाचा मुख्य उत्सव झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी कुस्त्यांचे भव्य सामने आयोजित करण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील नामवंत पैलवनांच्या लहान मोठ्या ४१ कुस्त्यांचे आयोजन यंदा करण्यात आले आहे.या कुस्ती सामन्यातील विजेत्या पैलवानांना धानोरी ग्रामस्थांच्या वतीने भरघोस बक्षीसांचे वाटप करण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळाची परंपरा राखण्यासाठी हे जंगी मैदान भरवले जाते. नामवंत पैलवान आणि मल्लांचा थरार पाहण्यासाठी पाहुणे मंडळी आणि कुस्तीशौकीन मोठी गर्दी करतात.
शहरीकरणातील अखंड परंपरा
आज धानोरीत आयटी संस्कृती आणि मोठमोठ्या सोसायट्या आल्या आहेत. मात्र, या शहरीकरणाच्या रेट्यातही धानोरीचे ‘गावपण’ या उरसामुळे टिकून आहे. नवीन रहिवासी आणि जुने ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, हे सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या ग्रामदैवताचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्याचे काम हा उत्सव मोठ्या आनंदाने करत आहे.
चला तर मग, सोमवार ९ फेब्रुवारी आणि मंगळवार १० फेब्रुवारी रोजी आपल्या ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होऊया आणि हा भक्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करूया!
















