अशोकबापू खांदवे यांच्या जनसंपर्काचे प्रतिबिंब निकालात
खांदवे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मिळाला जनाधाराचा फायदा; भाजपाच्या चारही उमेदवारांचा दणदणीत विजय
पुणे : प्रतिनिधी
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा लोहगाव परिसरातील ज्येष्ठ राजकीय नेते अशोकबापू खांदवे यांनी भाजपमध्ये प्रवेशकेल्यानंतर व्यक्त केलेला आत्मविश्वास अखेर प्रत्यक्ष निकालातून खरा ठरला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर खांदवे यांनी प्रभाग क्रमांक १ व ३ मधील भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे मिळालेल्या जनाधाराचा थेट फायदा भाजपला होत उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, स्थानिक राजकारणात खांदवे यांच्या प्रभाव वाढला आहे.
लोहगाव परिसरातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून अशोकबापू खांदवे यांची ओळख आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून ते हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापती पदापर्यंत त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. राजकारणासोबतच व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या खांदवे यांनी यापूर्वी महापालिका निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीनंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला होता. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी असलेल्या निकट संबंधांमुळे तसेच प्रभाग क्रमांक एक व तीनमधील भाजप उमेदवारांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत दास आप्पा खांदवे यांनीही पक्षप्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर लगेचच अशोकबापू खांदवे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधील पदयात्रेद्वारे भाजप उमेदवारांसाठी पठारे वस्ती, शंभू पार्क, सोपाननगर, पवार वस्ती आणि काळभोर वस्ती या भागांमध्ये जावून प्रचार सुरु केला होता.
प्रचारादरम्यान खांदवे यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांच्या वर्षावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. भाजपा उमेदवारांना मोठा जनाधार मिळत असल्याने विजयाची घोडदौड सुरु झाली होती. यावेळी बोलताना खांदवेनीं मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच स्वर्गीय प्रतापदादा खांदवे यांच्या कुटुंबाशी आपला स्नेह कायम असल्याचे स्पष्ट केले होते. पंचायत समितीच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवारांनी सहकार्य केल्यामुळे त्यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच भाजप नेतृत्वाने आपल्या अनुभव आणि कार्यानुसार योग्य राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.















