दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
मतदान केंद्र शोधताना मतदारांची भटकंती
प्रभाग १,२,३, ४ व ६ मध्ये किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (दि. १५) प्रभाग क्र. १, २, ३, ४ आणि ६ या प्रभागात मतदान करताना मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. यावेळी मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्यामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र शोधताना मतदारांची दमछाक होताना दिसली.
मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग १ (कळस-धानोरी), प्रभाग २ (फुलेनगर-नागपूरचाळ), प्रभाग ३ (विमाननगर-लोहगाव) आणि प्रभाग ६ (येरवडा-गांधीनगर) या भागांत सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा संथ होता, मात्र १० नंतर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. काही केंद्रांवर सकाळी ९ वाजेपर्यंत ८ ते १० टक्के मतदान झाले होते, जे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४० टक्क्यांच्या पुढे गेले होते.
सायंकाळी ५.३० नंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रभाग १ मध्ये ५२.९० टक्के मतदान झाले होते. प्रभाग २ मध्ये ५०.२८, प्रभाग ३ मध्ये ५४.१९ टक्के तर प्रभाग ६ मध्ये ५३.३९ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी काहीशी कमी असली तरी उमेदवारांचे विजयाचे आडाखे मात्र आत्मविश्वासपूर्ण दिसत होते. प्रत्येकच उमेदवार आम्हीच निवडून येणार याची खात्री देत होता.
बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे गोंधळ आणि चुरस –
यावेळची निवडणूक ‘बहुसदस्यीय प्रभाग’ पद्धतीने होत असल्याने मतदारांना एकाच वेळी चार मते देणे अनिवार्य होते. प्रभाग ३ मध्ये सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विमाननगर भागात ‘नोटा’ पर्यायाबाबत चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे निवडणूक लढवत असलेल्या प्रभाग क्रमांक चार खराडी वाघोली मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत होती.
मतदान केंद्रांवरील नाव शोधण्यात अडचणी येत होत्या. काही मतदारांनी तक्रार केली की, त्यांचे नाव यादीत असूनही मतदान केंद्र बदलल्यामुळे त्यांना केंद्र शोधण्यासाठी भटकंती करावी लागली. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ५:३० वाजता संपली असून, सर्व उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. उद्या, सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रभाग १ मधील मतदान केंद्र क्र. १०१ संत तुकाराम विद्यालय येथील खोली क्र.१ मध्ये सौ. छाया श्रीकांत मोहिरे, सौ.मेघा श्रीकांत मोहिरे, भूषण प्रकाश पटेल ह्या तीन मतदारांचे इपीक नंबर, ओळखपत्र होते परंतू यादीमध्ये फोटो व नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. ब्रिलीयंट इंग्लिश स्कुल लोहगाव येथे ‘अ’ गटाची मशिन ‘ब’ ठिकाणी उलटसुलट ठेवल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोबत: अंतिम मतदान टक्केवारी
नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणारे प्रभाग:-
प्रभाग क्रमांक 3 (विमान नगर – लोहगाव –) = 54.19 टक्के
प्रभाग क्रमांक 4 (खराडी- वाघोली)= 56.46 टक्के
प्रभाग क्रमांक 5 (वडगाव शेरी- कल्याणी नगर) =51.62 टक्के
येरवडा – कळस – धानोरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारे प्रभाग:-
प्रभाग क्रमांक १ (कळस – धानोरी- लोहगाव) :- 52.90%
प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर- नागपूरचाळ):- 50 %
प्रभाग क्रमांक ६ (येरवडा) :- 53 %



















