पोटात नवं जीवन… आणि हाती लोकशाहीचा झेंडा !
आठ महिन्यांची गरोदर, लोकशाहीच्या मैदानात…!
पोटात बाळाला घेऊन प्रचारात उतरणाऱ्या नुतन राहूल प्रताप ने दिली महिलांसाठी धैर्याची शिकवण..
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
“एक हात पोटावर फिरवून आतल्या जीवाची काळजी घेणारी आई…दुसऱ्या हातात समाजबदलाचं स्वप्न घेऊन दारोदार फिरणारी लोकप्रतिनिधी.” ही केवळ भावना नाही, तर ही होती पुणे महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ मधील एका महिला उमेदवाराची वास्तव कहाणी.
अनुसूचित जाती गटातून निवडणूक लढवणाऱ्या नुतन राहूल प्रताप या सध्या आठ महिन्यांच्या गरोदर असतानाही प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. शरीर स्वास्थ्याची मर्यादा असली तरी थंडीच्या कडाक्यात सुर्याचा किरण शोधणारी महिला लोकशाहीसाठी, समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
प्रत्येक घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवताना एकीकडे पोटातल्या जीवाची काळजी, तर दुसरीकडे मनात मात्र हजारो उपेक्षितांचे प्रश्न धगधगत होते. “मी थांबले, तर माझ्यासारख्या कितीतरी महिलांचा आवाज पुन्हा दाबला जाईल,” या विचारानेच त्या रोज सकाळी प्रचाराच्या मैदानात उतरत होत्या.
नुतन प्रताप भावूक होत सांगतात “हे बाळ माझी ताकद आहे, उद्या माझं मूल जेव्हा मोठं होईल, तेव्हा त्याने अभिमानाने सांगावं ‘माझी आई फक्त माझ्यासाठी नाही, तर समाजासाठीही लढली होती. लोकशाहीच्या लढाईत ताठ मानेने उभी होती” त्यांच्या ह्या प्रचंड आत्मविश्वासामुळे मतदारही आपुलकीने विचारपूस करत होते.
त्यांच्या प्रचारादरम्यान अनेकदा चित्र भावूक करून गेलं. कुठे वृद्ध महिला त्यांना मिठी मारत होत्या, कुठे तरुण मुली त्यांचे डोळे पुसताना दिसत होत्या. काही ठिकाणी नागरिक स्वतःहून खुर्ची आणून देत होते, पाणी देत होते, जणू संपूर्ण प्रभागच त्यांच्या पाठीशी उभा राहिला असे चित्र दिसत होते.
राजकारणाची वाट महिलांसाठी आधीच काटेरी, आणि त्यात गरोदरपण, अनेकांनी त्यांना “यावेळेस थांबा” असा सल्ला दिला होता. पण नुतन प्रताप यांनी तो नाकारला. कारण हा लढा केवळ निवडणुकीपुरता नाही, तर समाजातील महिलांच्या अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा आणि हक्कांचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांची ही वाटचाल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करते— की आई होणं खरंच महिलांची कमजोरी आहे का? की समाजासाठी उभं राहण्याचं सर्वात मोठं बळ? जय-पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. मात्र गरोदरपणाच्या आठव्या महिन्यातही लोकशाहीचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरलेली नुतन राहूल प्रताप यांची कहाणी ही लोकशाहीच्या इतिहासात कोरली जाणारी मातृत्वाची आणि धैर्याची साक्ष ठरत आहे.
आज त्या प्रचारात होत्या..
पण उद्या… त्या हजारो महिलांच्या मनात आशेचा किरण प्रकाशमान करून जातील एवढे मात्र निश्चित..















