मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावले
शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्तेत असताना ‘लाडकी बहीण’ योजना राबवता आली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ही योजना महाराष्ट्रात आणली. त्यामुळे या योजनेचे सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाते, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले.
“घड्याळाची टिक टिक कधीही बंद पडू शकते. त्यामुळे अजित पवार अलाराम वाजवत फिरत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, प्रदीप रावते आणि हेमलता बनसोडे यांच्या प्रचारार्थ धानोरी येथील भैरवनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
गोगावले म्हणाले, “मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. मात्र मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून, संपूर्ण माहिती घेऊन ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्रात सुरू केली, हे सर्वांना माहिती आहे.”
“आमचा धनुष्यबाण ताणला तर तो सुसाट जाऊ शकतो. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत आम्ही वेगळे लढण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून येतील,” असा दावाही त्यांनी केला.
प्रभाग क्रमांक १ मधील सर्व उमेदवार सक्षम व अभ्यासू असून या परिसरात चालणारी कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “कोकणी समाज हा कुणाच्याही मक्तेदारीचा नाही. तो शिवसेनेचाच मतदार असून, यावेळी तो शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असे आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी क्रिस्ट जवळ यांनी धडाकेबाज भाषण करत आमचे चारही उमेदवार प्रस्थापितांना शह देत निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. या जाहीर सभेला सर्व उमेदवारांसह सतीश म्हस्के, विवेक बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
















