विकास व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भाजप–आरपीआय एकत्र : रामदास आठवले
फुलेनगर-नागपूर चाळ प्रभाग: भाजप-आरपीआय उमेदवार प्रचारात आघाडीवर

येरवडा: प्रतिनिधी
“एक गेल्याशिवाय शंभर येत नाही. ज्यांना संधी दिली, ते निघून गेले; मात्र जनता विकासाच्या बाजूने उभी राहते,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूरचाळ येथे झालेल्या जाहीर सभेत केले. प्रभाग क्रमांक २ मधील भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ऍड.रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, आदिती बाबर व राहुल जाधव या उमेदवारांच्या समर्थनार्थ आठवले बोलत होते.
महापुरुषांना वंदन करून आपल्या छोटेखानी पण प्रभावी भाषणात त्यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली. “प्रभाग क्रमांक २ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि येथील मतदार भाजप-आरपीआय च्या उमेदवारांना निवडून देत योग्य निर्णय घेतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारांच्या दैनंदिन प्रश्नांकडे लक्ष वेधत आठवले म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर आरपीआय भाजपसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागामार्फत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा, विधवा भगिनींना मदत तसेच परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी भाजप-आरपीआयच्या चारही अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
या वेळी माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी, ऍड.भगवान जाधव, अशोक कांबळे, मंगेश गोळे, बाळासाहेब जानराव ,सुभाष चव्हाण, नानासाहेब नलावडे ,महेश पाटील ,मंदार खरात ,प्रकाश साळुंखे ,राजू बाफना, राकेश मोहिते, हर्षद जाधव, डॉ योगेश कदम ,प्रकाश सोनवणे, विनोद टोपे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे प्रभागातील मतदारांमध्ये विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा रंगली.















