भाजपाने आयात उमेदवार दिल्याने मतदारांचा आपल्याला प्रचंड प्रतिसाद : लक्ष्मी माने-इंगुळकर
प्रभाग क्रमांक १
धानोरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीकडे एससी उमेदवार असताना शेवटच्या क्षणी विमाननगर हून आयात उमेदवार द्यावा लागला. त्यामुळे एससी इच्छुकांसह समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आपल्या पथ्यावर पडणार असून आपण विजयी होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार
लक्ष्मी माने-इंगुळकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १ कळस- धानोरी-लोहगाव प्रभागात मनसे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवारांनी कळस, धानोरी, लोहगाव परिसरात पदयात्रा तसेच वयक्तिक गाठीभेटी द्वारे मतदारांशी थेट संपर्क वाढविला आहे.
प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गात आयात उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी असून, समाजाच्या विविध स्तरांतून आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा प्रचारादरम्यान लक्ष्मी माने-इंगुळकर यांनी केला.
मनसेचे उमेदवार लक्ष्मी माने-इंगुळकर, गायत्री साळुंके आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार सोमनाथ उर्फ बाळासाहेब खांदवे यांनी प्रभाग १ मधील कळस, धानोरी, मुंजाबा वस्ती, पोरवाल रोड, लोहगाव या संपूर्ण प्रभागात पदयात्रा व वयक्तिक गाठी भेटीवर संपर्क साधत जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे.
या वेळी मनसे उमेदवार लक्ष्मी माने इंगुळकर म्हणाल्या, प्रभागात आयात केलेल्या उमेदवारांना जनता स्वीकारणार नाही. आम्हाला समाजाच्या विविध स्तरांतून जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. या वेळी राजू उर्फ लिंगू साखरे, शांताराम खलसे, एकनाथ खांदवे, निखिल खांदवे, सागर ठोंबरे, अजिंक्य अहिरेकर, संजय मोझे उपस्थित होते.















