भाजपाचाच महापौर होणार; मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास
लोहगाव मधील जाहीर सभेला प्रचंड गर्दी
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
“पुणे महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. लवकरच पुणे विमानतळास जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे नाव दिले जाणार असून लोहगावचे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) येथे भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीच्या वतीने आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते.
या सभेत व्यासपीठावर भाजप-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे यांच्यासह व्यासपीठावर माजी आमदार जगदीश मुळीक, उत्तर जिल्हा प्रमुख प्रदिप कंद, माजी नगरसेविका श्वेता गलांडे – खोसे, मंगेश गोळे, राजेंद्र खांदवे, हनुमंत खांदवे, आदित्य खांदवे, दिपक खांदवे, सोमनाथ खांदवे, सुनिल खांदवे, संतोष खांदवे, श्वेता काळे, महेश गलांडे, मीनाकाकी सातव, जयश्रीताई सातव, दगडू खांदवे, प्रमोद खांदवे, संदिप मोझे, मोहनराव शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेपूर्वी उमेदवारांनी लोहगाव बस स्टॉप ते आझाद नगर मार्गे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत पदयात्रा काढली. या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
परिवर्तन सभेत भारतीय जनता पक्षाने नुकताच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रभाग क्रमांक ०३ साठीच्या ठोस विकासकामांची माहिती मांडण्यात आली. हा जाहीरनामा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार केलेला वेळबद्ध व परिणामकारक विकासाचा रोडमॅप असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जाहीरनाम्यानुसार खडकवासला ते खराडी या नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार लोहगाव येथील पुणे विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे विमाननगर-लोहगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना जलद सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच जांभूळवाडी, कात्रज, पाषाणसह लोहगाव येथील तलावांची स्वच्छता, सुशोभीकरण व पर्यावरणपूरक विकास करून पुणे शहराला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
याशिवाय पुणे विमानतळावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीरनाम्यात समाविष्ट असून यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले,
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहरात मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, बसेस वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक मोठी विकासकामे झाली आहेत. येत्या काळात पुणे विमानतळापर्यंत मेट्रो प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळेल.”
ते पुढे म्हणाले,
“महापालिकेतील सत्ता गाजवण्यासाठी नाही, तर जनतेच्या सेवेसाठी भाजपाला संधी हवी आहे. विविध सर्व्हेक्षणांनुसार प्रभाग क्रमांक ०३ मधील भाजप-आरपीआय महायुतीचे हे चारही उमेदवार सध्या आघाडीवर असून ते निश्चितपणे विजयी होणार आहेत.”
परिवर्तन सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. चारही उमेदवारांनी कडक भाषणे करत आपले व्हिजन सांगितले.या सभेमुळे प्रभाग क्रमांक ०३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याचे दिसून आले.















