फुलेनगर-नागपूरचाळ प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपची प्रचारात मुसंडी
भाजपाचे सुशिक्षित उमेदवार म्हणून मतदारांचा मिळतोय प्रतिसाद
पुणे : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २ मधील माननियांनी महापालिकेच्या मार्फत प्रभागात आलेल्या निधीचा योग्य वापर केला नाही. केवळ भ्रष्टाचार केला असून यावेळी भाजपा मध्ये तरुण, सुशिक्षित चेहरे दिल्याने मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चारही तरुण उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून यावेळी नवीन, सुशिक्षित चेहऱ्यांना नक्की संधी मिळणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.२फुलेनगर – नागपूरचाळ मध्ये भाजपा- आर पी आय आठवले गटाचे उमेदवार ऍड.रेणुका चलवादी ,सुभाष वाघमोडे,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत अदिती बाबर या उमेदवारासह परिसरातील नागरिकांनी विद्यानगर- टिंगरेनगर परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. यावेळी भाजप व आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेणुका चलवादी म्हणाल्या, या प्रभागात झोपडपट्टीचा परिसर अधिक असल्याने झोपडपट्टी मधील रहिवाशांचे रहाणीमान उंचावणार आहे. म्हाडाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावणार आहे. प्रभागात सुरू असलेले अवैध धंदे बंद करून प्रभाग गुन्हेगारी मुक्त कसा होईल यासाठी आपला प्रयत्न राहील. फिरून- फिरून सत्ता त्याच त्याच मंडळींच्या घरात जात असल्याने विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन नक्की होणार असून युवा चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. आम्ही चारही जण मिळून प्रभागाचा विकास करू शकतो.















