प्रभाग टँकर मुक्त करणार: अनिल टिंगरे
शक्ती प्रदर्शन करत भैरवनाथाच्या मंदिरातून शुभारंभ
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग एकमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. आगामी काळात पाणीपुरवठा ज्या सोसायट्या मध्ये पाणी पुरवठा होत नाही त्याठिकाणी सुरळीत करून प्रभाग टँकरमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच एक गुंठा जमीन देण्याचे आमिष दाखवत नागरिकांच्या भावनांशी खेळणे म्हणजे विकास नव्हे, अशी टीका विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर भाजपचे उमेदवार अनिल (बॉबी) टिंगरे यांनी केली.


प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टी व आरपीआय(आठवले) पक्षाच्या पॅनेलचे अधिकृत उमेदवार अनिल(बॉबी) टिंगरे, वंदना खांदवे, संगीता दांगट, अश्विनी भंडारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. धानोरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांना नारळ वाढवून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजप उमेदवारांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांच्यासह लोहगाव, कळस, धानोरी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक बंधू-भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक:-
प्रभाग एकमध्ये अनिल(बॉबी) टिंगरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या माध्यमातून पुणे शहरात देखील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प व विकासकामे झाली आहेत. त्यामुळे
शहरातील वातावरण भाजपमय झाले असल्याने पालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे. २०१७ मध्ये १०० नगरसेवक होते. परंतु यावेळी १२५ पेक्षा जास्त भाजपचे नगरसेवक निवडून येतील. विजयाची सुरुवात प्रभाग एकमधून होणार असल्याचे माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले.















