सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नगरसेवक करा
बंडू खांदवे यांच्या वाढदिवसानिमित आमदार कटकेंचे जोरदार भाषण
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून एकीकडे आमदारांची पैसेवाली लोकं समोर असणार आहेत.
पण सर्व सामान्य कुटुंबातून येणाऱ्या, मायबाप जनतेला देव दर्शन घडवून आणणाऱ्या बंडू खांदवे यांना नगरसेवक करा असे आवाहन शिरूर – हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी केले.
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर- लोहगाव- वाघोली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बंडू खांदवे यांचा लोहगाव मधील त्रिमूर्ती लॉन्स याठिकाणी वाढदिवस साजरा झाला. यावेळी आमदार कटके यांनी तुफान भाषण केले. बंडू खांदवे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नेते पांडुरंग (आप्पा) खेसे, राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघाचे अध्यक्ष सतीश म्हस्के, रमेश आढाव, नितीन भुजबळ, सुनील खांदवे, संतोष मोझे, अर्जुन गरुड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रभागातील पदाधिकारी तसेच लोहगाव-विमाननगर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंडू खांदवे म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि निःस्वार्थ प्रेमामुळे सार्वजनिक कार्य करण्याची प्रेरणा अधिक दृढ झाली आहे. आपण दाखवलेला विश्वास, सन्मान आणि स्नेह आयुष्यभर जपण्याचा मी प्रयत्न करीत राहीन. आपल्या सहकार्यानेच विकासाचा प्रवास अधिक वेगाने आणि मजबूत पद्धतीने पुढे जाईल, याची मला खात्री आहे.















