उबाठा चे माजी गटनेते संजय भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश
येरवड्यातील राजकीय समीकरणे बदलली
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
येरवडा येथील शिवसेना उबाठा पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील माजी गटनेते संजय भोसले, अश्विनी संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ६ व १३ मधून भोसले पती पत्नी महापालिका निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. येरवड्यातील शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. भोसले यांच्या पक्ष प्रवेशानंतर येरवड्यातील महाविकास आघाडीची समीकरणे बदलणार आहेत.
भाजपा पुणे शहर पक्ष कार्यालयात केंद्रीय राज्य मंत्री मुलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणुक प्रमुख गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थित प्रवेश झाला.
प्रवेश झाल्यानंतर बोलताना संजय भोसले म्हणाले, येरवड्यात आपण तीन वेळा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकलो आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडी म्हणून कोणत्या तोंडाने मत मागायला मतदारांसमोर जाणार. याशिवाय काँग्रेसच्या दारात उमेदवारी साठी आपल्याला जावे लागत होते त्यामुळे येरवड्यात हिंदुत्वाचा विचार टिकवून ठेवण्यासाठी भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भोसले पती पत्नी यांनी भाजपा प्रवेश केल्याने प्रभाग क्रमांक ६ व १३ मध्ये या दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे तीनही माजी नगरसेवक वेगवगेळ्या पक्षात
२०१७ साली महापालिका निवडणुकीत येरवड्यातून तीन जण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र त्यामधील अविनाश साळवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी श्वेता चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) माजी गटनेते संजय भोसले यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामुळे उबाठाचे गत वेळी निवडून आलेले तीनही माजी नगरसेवक आज वेगवगेळ्या पक्षात गेल्याने पक्षाला खिंडार पडले आहे.
येरवड्यातील समीकरणे बदलली
भोसले यांनी शिवसेना सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याने महायुती मधून उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा कडून येरवड्यातून ज्ञानेश्वर मोझे, अनवर पठाण, संतोष राजगुरू हे उमेदवारी मागत आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) मधून आनंद गोयल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असताना भोसले यांचा पक्ष प्रवेश झाल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. भोसले पती पत्नी दोघेही इच्छुक असल्याने प्रभाग ६ येरवडा, आणि प्रभाग १३ पुणेस्टेशन- जय जवान नगर मधून एक एक उमेदवार असू शकतात.















