धर्मांतर करूनही एससी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना उमेदवारी नको; सोशल मिडियावर चर्चा
पुणे : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनादरम्यान (दि.१७ जुलै २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत अत्यंत महत्त्वाचे विधान केले होते. जर हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म वगळता इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने बनावट पद्धतीने अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र मिळवले असेल, तर ते त्वरित रद्द केले जाईल आणि अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे धर्मांतर करून इतर धर्म स्वीकारलेल्याना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये असा मेसेज सोशल मिडियावर सर्वत्र फिरत आहे. याची जोरदार चर्चा सुरू खास करून एससी आरक्षण असलेल्या जागांवर होत आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असून सर्वच प्रवर्गातून उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. उमेदवारी मूळ आरक्षणाचा लाभार्थी असलेल्यांना मिळावी यासाठी ओबीसी सह अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये मूळ लाभार्थींना उमेदवारी द्यावी असा स्वरूपाचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून सर्वत्र फिरत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप ओरपे म्हणाले, धर्मांतर करून इतर धर्म स्वीकारूनही जे लोक कागदोपत्री अनुसूचित जाती (SC) समुदायाचे असल्याचे दर्शवतात, परंतु गुप्तपणे धर्मांतर केलेल्या धर्माचे पालन करतात आणि फक्त आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी आपला मूळ अनुसूचित जातीचा दर्जा कायम ठेवत असल्या बाबत आपण जात पडताळणी कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. माझ्या माहितीनुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातील व्यक्तींनाच मिळू शकतात, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला आहे. या निकालाच्या विरोधात जाऊन, ‘ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वापरून राजकीय आरक्षणाचा फायदा पुणे महानगर पालिका निवडणुकीत अनेक जण घेत असल्याचे आरोप ओरपे यांनी केला आहे. अशा धर्मांतरित व्यक्ती राजकीय आरक्षणाचा लाभ घेत असतील तर खऱ्या अनुसूचित जातीतील (हिंदू, बौद्ध, शीख) लोकांना राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागते. यामुळे आरक्षणाचे मूळ उद्दिष्ट आणि सामाजिक न्यायाची संकल्पना धोक्यात येते. इतर धर्माच्या व्यक्तीने अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राचा गैरवापर केल्यास, सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ओरपे यांनी प्रसिद्ध माध्यमांच्या द्वारे केली.














