मनपा निवडणुक १५ जानेवारी पर्यंत
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच आचारसंहिता लागू शकते.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकांचे सूप वाजू शकतात. तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर केव्हाही होऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती समोर आली आहे. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यानिमित्ताने एकत्रित येऊ शकतात आणि तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुणे भाजपला ही निवडणुक सोपी नसणार एवढे नक्की.















