वाघोलीतील उबाळेनगर परिसरात बिबटया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
वाघोली येथील उबाळेनगर परिसरात मंगळवारी (दि. ९) पहाटे साडे पाचच्या सुमारास बिबटया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण आहे.
अष्टापूर येथे मंगळवारी पहाटे बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच त्याच वेळेला वाघोली परिसरातील उबाळेनगर रेणुका पार्क परिसरामध्ये रोडवरील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा बिबटया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उबाळेनगर येथील रिक्षा चालकाला पहाटे बिबटया सदृश्य प्राणी वाटल्याने त्यांनी सीसीटीव्ही चेक करण्यासाठी शेजारच्यांना कळविले. अॅड. कीर्ती अहुजा यांनी सीसीटीव्ही चेक केले असता पहाटेच्या सुमारास बिबटया त्यांना दिसून आला. बुधवारी बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अहुजा यांनी बिबटयाबाबत वन विभाग व संबंधित विभागाला कळविले आहे.
वाघोली परिसरामध्ये असलेल्या वडगावशिंदे, लोहगाव, आव्हाळवाडी, मांजरी, कोलवडी भागामध्ये बिबट्या वारंवार नागरिकांना दिसत असल्याच्या व बिबटयाने अनेक छोटया प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दाट लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये बिबटयाचे दर्शन झाले असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















