वाघोली ते च-होली रिंग रोड साठी आयुक्तांनी केली जागा मालकांशी चर्चा
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
वाघोली ते चऱ्होली हा पाच किलो मीटरचा रिंग रोड तातडीने करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता होणे गरजेचा आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना आयुक्त नवल किशोर राम यांनी चर्चेसाठी बोलविले होते.
या बैठकीसाठी आयुक्त नवल किशोर राम, पथ विभागाचे प्रमुख अनिल अनिरुद्ध पावसकर यासह हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे , गणेश खांदवे, यासह जागा मालक उपस्थित होते.
यावेळी अशोकबापू खांदवे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. ते म्हणाले, ६५ मीटर रुंदीचा हा रिंग रोड असून बाजूला १२ – १२ मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता करण्यात आला आहे. तो सर्व्हिस रस्ता तरी रद्द करावा. ज्या जागा मालकांच्या जमिनी रस्त्यांमध्ये बाधित होणार आहेत त्यांना मोबदला देऊन पुन्हा त्यांच्याच जमिनीवर इतरत्र आरक्षण टाकू नये. व ते टाकले असल्यास ते रद्द करण्यात यावे. पठारे वस्तीवरील ३६ मीटर रुंदीचा रस्ता कमी करण्यात यावा जेणेकरून नागरिकांची घरे वाचतील. रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या एक दोन गुंठे प्लॉट धारकांना रोख स्वरूपात टीडीआर द्यावा. अशा मागण्या यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत अशोक खांदवे यांनी केले आहे. यावेळी आयुक्तानी सकारात्मक भूमिका दाखवली आहे.
















