ग्रीन धानोरी साठी १० हजाराहून अधिक नागरिक धावणार
माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या माध्यमातून ग्रीन धानोरी मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता केले आहे. सदर स्पर्धेसाठी 12 हजार हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून सुमारे 10 हजार नागरिक स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती मुख्य आयोजक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी दिली. आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश मॅरेथॉन स्पर्धेतून देण्यात येणार आहे.
बॉबी टिंगरे म्हणाले, धानोरी डोंगराजवळ अरण्याशेवर मंदिरा शेजारी पुणे महानगर पालिका आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन उद्यान साकारण्यात येत आहे. त्याच बरोबर वाढलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे माता जिजाऊ प्रतिष्ठान च्या माध्यमातून पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी धानोरी जकात नाका ते वन उद्यान या सुमारे साडे तीन किलो मीटर अंतरावर मॅरेथॉन स्पर्धेची आयोजन केले आहे. स्पर्धा वयोमर्यादा १५ ते ३०, ३१ ते ५० व ५१ वयाच्या पुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, पाणी, चहा, नाष्टा याची सोय केली आहे. तर विजेत्या स्पर्धकांना सायकल व ट्रॉफी भेट देण्यात येणार आहे. या स्पर्धे करिता कळस, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव भागातील आता पर्यंत १२ हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यामधील किमान १० हजार नागरिक तरी प्रत्यक्षात धावण्यासाठी येतील. यानिमित नागरिकांना वन उद्यान बघण्यास मिळणार असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण व बक्षीस वितरण कार्यकम होणार आहे. कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार बापुसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, वन विभागाचे अधिकारी यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माता जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष शैलेश राणवरे, उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले आहे.















