वाघोलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी
वाघोली परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांकडून सतत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत वाहतूक पोलिसांनी केसनंद चौक, आव्हाळवाडी चौक आणि बकोरी फाटा परिसरात विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केली आहे. रस्त्याच्या मध्यभागी थांबून प्रवासी घेणे, मीटर न लावणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, नो-एंट्रीत प्रवेश करणे, मोबाईल वापरत वाहन चालवणे तसेच विनापरवाना वाहतूक करणे अशा नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून वाघोली येथे जड, अवजड वाहतूक, ऑटो रिक्षा आणि खासगी ट्रॅव्हल्सवर मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी काळात ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया :
रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. वाहतुकीचा वेग सुरळीत ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही कठोर कारवाईमध्ये सातत्य ठेवणार आहे. - पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा, वाघोली)
प्रतिक्रिया :
दररोज सकाळ-संध्याकाळ रिक्षा, ट्रॅव्हल्स रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहिल्याने ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास करावा लागत आहे. पोलिसांच्या कारवाई स्वागतार्ह आहे. कारवाईमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. - संदीप कटके, (अध्यक्ष – जी. के. फाउंडेशन, वाघोली)














